मोठं मन
पूर्वीचा काळ बाबा खरंच होता चांगला,
साधं घर साधी माणसं, कुठे होता बंगला?
घरं जरी साधेच पण, माणसं होती मायाळू,
साधी राहणी चटणी भाकरी, देवभोळी अन श्रद्धाळू
सख्खे काय चुलत काय, सगळेच आपले वाटायचे,
सुख असो दुःख असो, आपुलकीने भेटायचे.
पाहुणा दारात दिसला कि खूप आनंद व्हायचा हो,
हसून खेळून गप्पा मारून, शीण निघून जायचा हो.
श्रीमंती जरी नसली तरी,एकटं कधी वाटलं नाही,
खिसे फाटके असले तरीही, कोणाचं काम थांबल नाही.
उसनं पासन करायचे पण, पोटभर खाऊ घालायचे,
पैसे आडके नव्हते तरीही, मन मोकळं बोलायचे.
लपाछपी पळापळी, बिन पैश्याचे खेळ हो,
कुणीच कुठे बिझी नव्हते, होता वेळच वेळ हो.
चिरेबंदी वडे सुद्धा, खळखळून हसायचे,
निवांत गप्पा मारीत माणसं ओसरीवर दिसायचे.
सुख शांती समाधान ते, आता कुठे दिसत का?
पॉश पॉश घरांमध्ये तशी मैफिल सजते का?
नाते गोते घट्ट होते, किंमत होती माणसाला,
प्रेमामुळे चव होती, अंगणातल्या फणसाला.
तुम्हीच सांगा नात्यांमध्ये, राहिला आहे का राम ?
मुलीकडे आईचा असतो का मुक्काम?
सख्खे भाऊ, सख्ख्या बहिणी, कुणीच कुणाला बोलत नाही,
मृदूंगाच्या तालावरती गाव आता डोलत नाही.
प्रेम, माया, आपुलकी हे शब्द आम्हाला गावतील का?
बैठकीतल्या सतरंजीवर, पुन्हा पाहुणे मावतील का?
हि कविता कोणी लिहीली माहीत नाही पण जेव्हा मी ही वाचली तेव्हा मला गावाकडचे जुने दिवस आठवले. आता तर खरंच कोणी जवळ असूनही जवळ नाही. आपले असूनही आपले नाहीत. भावना आपलेपणा यांच्याशी दुरवर काहीही नाते नाही. आपण सगळे आपल्यात असे रममाण झालोत की आपल्याला दुस-याशी काही देणघेणंच उरलं नाही. कसं असेल ना जग अजून काही दिवसांनी माणस माणसाकडे बघितील तरी का? काय वाटत तुम्हाला?
उत्तर द्याहटवा