आई वडील आले माझ्या वाट्याला
बंगला गाडी गेली वाटणीत मोठ्याला
घराजवळची बाग मिळाली धाकट्याला
सुपीक शेतीची जागा दिली छोट्याला
किती माझे भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला
पंच जमले होते आम्ही वाटणी करताना
आगीत तेल घालत होते आम्ही भांडताना
आम्ही उत्सुक होतो हिस्सा मागताना
त्यांना आनंद होत होता घर दुभंगलेलं बघताना
सगळ्यात धन संपत्ती हवी होती मोठ्याला
किती माझे भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला
संपत्ती नावावर करण्याची प्रत्येकाला झाली होती घाई
आम्हाला कोण सांभाळेल या आशेनं बघत होते बाबा आई
आई बाबा माझ्याकडे चला म्हणायला पुढे कोणच सरकला नाही
मला कळतच नव्हतं माझ्या वाट्याला येईल का काही
दाग दागिने आईचे दिले पंचांनी धाकट्याला
किती माझे भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला
सगळे खुश झाले बनून करोडपती
फक्त आई वडील हीच आपली मोठी संपत्ती
आई वडिलांच्या आशीर्वादाने मला मिळाली सुखशांती
शेवटी आई वडिलांचा आशीर्वाद येईल कमी अंती
किती नशीबवान मी काहीच नाही माझ्या साठ्याला
किती माझे भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला
